*उदयोस्तु श्री जगदंबे !*
*नवरात्र प्रथम दिवस.--आश्विन शुद्ध प्रतिपदा, गुरूवार दिनांक--०३/१०/२०२४-----*
*श्री नवरात्र घटस्थापना पूजेची माहिती.*
१) *पूजेची पूर्वतयारी*----
*आश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी पहाटे देवघरात किंवा घरातील अत्यंत शुचिर्भूत अशा जागी घटस्थापना करावी. ज्या जागेवर घटस्थापना करायची आहे ती जागा पाण्याने स्वच्छ करावी. नंतर त्यावर रांगोळी काढावी. रांगोळीवर हळदीकुंकू टाकावे.मध्यभागी अक्षता ठेवून त्यावर पाट/चौरंग/परात/परडी ठेवावी. आपल्या उजव्या बाजूला पाटावर मुठभर तांदूळ ठेवून त्यावर श्री गणपतीची मूर्ती किंवा श्री गणपतीसाठी एक सुपारी ठेवावी. उजव्या बाजूला शंखतर डाव्या बाजूला घंटा ठेवावी.*
*नंदादीपासाठी एक/दोन समई तयार करून समई ज्या ठिकाणी ठेवायची आहे त्या ठिकाणी रांगोळी काढावी.आपल्या प्रवेशद्वारा जवळ रांगोळी काढून दारावर तोरण आणि आंब्याचा टहाळा बांधावा.घटाच्या कलशावर ओल्या गंधाने किंवा कुंकवाचे स्वस्तिक काढून पाच उभ्या रेषा काढाव्यात.पाच विड्यांच्या पानांचे सेट तयार करून ठेवणे.*
*घटस्थापना करायच्या आदल्या दिवशी म्हणजे आज सर्व नवधान्ये हळदीच्या पाण्यात भिजवून ठेवावीत म्हणजे अंकूर पिवळ्या रंगाचा येतो.*
*श्री घटस्थापना पूजेचे साहित्य जवळ घेऊन बसावे आणि पूजेस प्रारंभ करावा.*
*( ज्या ठिकाणी पूजेसाठी गुरूजी उपलब्ध झाले नसतील तर अशा भाविकांसाठी श्री घटस्थापना पूजेची यादी वेगळी पाठवत आहे. )*
*२)श्री नवरात्र घटस्थापना पूजा साहित्य---*
*हळद,कुंकू, शेंदूर, गुलाल,रांगोळी,अष्टगंध, दूर्वा, बेल,तुळस, फुले, सुवासिक फुले, हार २, फुलांची १ माळ, आंब्याचे टहाळे २, तांदूळ २ किलो, पंचामृत( दूध, दही,तूप, मध,साखर), उटणे,गुलाबपाणी, दूध १ लिटर, विड्याची पाने ३०, सुपारी २५, बदाम ५, खारीक ५, हळकुंड ५, आक्रोड ५, गुळ-खोबरेवाटी १, सुट्टे पैसे--१ रूपयाची १५ नाणी, अत्तर, शंख, घंटा, उदबत्ती, निरांजन, समई १, कलश २, ताम्हण २, पळी भांडे १, लाल माती, नवधान्ये(भात,मका,गहू,जोंधळे, मूग,हरभरे इत्यादी), वनौषधी( हळद,आंबेहळद,नागरमोथा, इत्यादी), लाल वस्त्र सव्वा मीटर १, ब्लाऊजपीस २ , करंडाफणी २, कापसाची वस्त्रे २, जानवी २, फळे ५, पेढे पावकिलो, साखरफुटाणे,नारळ ५,हळद घालून पाणी, परात किंवा परडी.*
*३) श्री घटस्थापना पूजाविधी माहिती पुढीलप्रमाणे*
*आश्विन शुद्ध प्रतिपदा, रविवारी पहाटे यंदाचा श्री देवीचा शारदीय नवरात्रौत्सव प्रारंभ होत आहे.*
*या दिवशी घराघरांत आणि देवींच्या मंदिरात घटस्थापना केली जाते.*
*या दिवशी पहाटे उठून पूजा करणाऱ्या यजमानाने अभ्यंगस्नान करावे. घरातील देवांची पूजा करावी.*
*ज्यांच्याकडे घटस्थापना होते अशा भाविकांनी आपल्या घरातील सर्व देवांच्या मूर्ती आणि टाक एका विड्याच्या पानावर ठेवावेत.*
*घरातील सर्व देवांची पूजा झाल्यावर घटस्थापना पूजा प्रारंभ करतांना पूजा करणाऱ्या यजमानाने प्रथम स्वतःला कुंकुमतिलक करावे. देवांपुढे विडा, सुपारी, दक्षिणा ठेवून सर्व देवांना आणि घरातील सर्व मोठ्या व्यक्तींना नमस्कार करून घटस्थापना पूजा विधीस प्रारंभ करावा.*
*प्रथम आचमन करून घटस्थापनेचा संकल्प करावा.प्रथम श्री गणपतीचे आवाहन करावे आणि श्री गणपतीवर तीन वेळा अक्षता वहाव्या.नंतर पाणी भरून घेतलेल्या कलशाची पूजा करावी नंतर शंख,घंटा यांची पूजा करावी. प्राणायाम आणि षडंगन्यास करावे. नंतर आपल्या चारही दिशांना अक्षता टाकाव्यात आणि आपल्या आसनाखाली अक्षता टाकाव्यात. नंतर कलशातील पाणी,गोमूत्र एकत्र करून ते पाणी पूजा साहित्यांवर,सर्व घरात आणि आपल्या अंगावर शिंपडावे.*
*प्रथम श्री गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ताम्हणात घेऊन श्री गणपतीचे मूर्तीला पंचामृताने,गंधाने, गुलाबपाणी, उटणे, अत्तर इत्यादी सर्व प्रकारचे स्नान घालून श्री गणपतीची पूर्वपूजा करून नंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ करून श्री गणपतीचे मूर्तीवर अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक घालून श्री गणपतीची मूर्ती स्वच्छ करून तांदळावर ठेवून श्री गणपतीस गंध,अक्षता, हळदीकुंकू, शेंदूर,लालफुल आणि दूर्वा वाहून श्री गणपतीस गुळखोबरे यांचा नैवेद्य दाखवून अर्पण करावा.*
*श्री गणपतीस एक नारळ,फळे आणि विड्याचे पानावर सुपारी आणि दक्षिणा त्यावर ठेवून पाणी सोडावे. आणि श्री गणपतीची प्रार्थना करावी आणि श्री गणपतीस नमस्कार करावा.*
*नंतर घटस्थापना करावी.*
*आपल्या कुलदेवतेच्या किंवा नित्य पूजेच्या उजव्या बाजूला तांबड्या मातीची वेदी करून त्यावर शुध्दोदकाने भरलेल्या व वारूळ, गोठण इत्यादी पवित्र ठिकाणची माती आत घातलेल्या कलशाची स्थापना करून त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यात श्री देवीची मूर्ती ठेवावी किंवा कलशावर नारळ ठेवून पूजा करावी. याला घटस्थापना असे म्हणतात.*
*प्रथम कलश ठेवावा.*
*कलशामध्ये पाणी,गंगाजल घालावे. गंध,हळदीकुंकू घालावे.नंतर कलशात हळद,आंबेहळद, नागरमोथा इत्यादी प्रकारची वनौषधी घालावी. नंतर दोन दूर्वा घालून आंब्याचा टहाळा ठेवून नंतर कलशात थोडीशी माती टाकावी. नंतर सुपारी व पैसा कलशात सोडावा. नंतर कलशावर पूर्णपात्र किंवा नारळ कुंकू लावून ठेवावा.*
*नंतर घटाची पंचोपचारे पूजा करावी. म्हणजे या ठिकाणी घटस्थापना पूर्ण झाली.*
*घटस्थापना झाल्यावर कलशाभोवती बारीक तांबडी माती चारी बाजूला पसरावी.त्या मातीत नवध पेरावीत. त्यावर पुन्हा माती पसरावी आणि हळद घातलेले पाणी त्यावर शिंपडावे.*
*अंकुर पिवळ्या रंगाचा यावा यासाठी हळदीचे पाणी करून त्यावर शिंपडावे किंवा मूळ धान्यच हळदीच्या पाण्यात थोडा वेळ भिजत घालावे.*
*घटाची प्रार्थना करावी नंतर अखंड नंदादीपाची स्थापना करावी.-- घटाजवळ नऊ दिवसापर्यंत नंदादीप अखंड तेवत ठेवणे हा या नवरात्र पूजेतील अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. हा दीप तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस आणि तेलाचा असेल तर डाव्या बाजूस ठेवावा. ज्या जागी हा दिवा ठेवायचा असेल त्या ठिकाणी भूमीची,वास्तुची पूजा करुन दीवा प्रज्वलन करावा आणि नंतर दीव्यांची पंचोपचारे पूजा करावी.*
*नंतर आपल्या परंपरेनुसार घटाचे समोर श्री देवीची मूर्ती ठेवून देवीसमोर तीन सुपाऱ्या ठेवाव्यात. या तीन सुपाऱ्या म्हणजे श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आहेत. त्यांना अक्षता वाहून स्थापना करावी. नंतर नवदुर्गांच्या नऊ सुपाऱ्या पूर्वेकडून एकेक ठेवून त्यांची अक्षता वाहून स्थापना करावी.*
*नंतर श्री देवीची मूर्ती ताम्हणात घेऊन देवीचे ध्यान आणि आवाहन करून देवीची पंचामृत, गंध, उटणे, गुलाबपाणी, अत्तर इत्यादी प्रकारे स्नान घालून श्री देवीची पूर्वपूजा करून नंतर देवीची मूर्ती स्वच्छ करून मूर्ती ताम्हणात ठेवून देवीचे मूर्तीवर श्रीसूक्त किंवा श्री देवी अथर्वशीर्ष म्हणून दूध, पाणी घालून अभिषेक करावा. नंतर देवीची मूर्ती स्वच्छ करून जागेवर ठेवून तिची पूजा करावी. घटावर पहिल्या दिवसाची माळ सोडावी. कलशावर हार घालून श्री देवीला फुले, हार,गजरा आणि वेणी वाहावी.धुपदीप दाखवून देवीला नैवेद्य अर्पण करावा. यावेळी पेढे,गोड पदार्थ, मिठाई, फळे, गाईचे तुप, साखरफुटाणे इत्यादी प्रकारचे नैवेद्य अर्पण करावे. नंतर नारळ आणि विडा,सुपारी आणि दक्षिणा देवीसमोर ठेवावी. एक नारळ आणि विड्याच्या दोन पानांवर सुपारी आणि पैसा ठेवून तो विडा आणि नारळ घटाच्या मागच्या बाजूस ठेवावा. म्हणजे हा नारळ दहा दिवस हलवता येणार नाही.नंतर देवीला अलंकार अर्पण करून घरातील सुवासिनीने श्री देवीची ओटी भरावी.नंतर आरती करून आरतीला उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना प्रसाद वाटप करावा. मंत्रपुष्पांजली म्हणून देवीची प्रार्थना करावी नंतर पूजा पूर्ण झाली असे म्हणून ताम्हणात पाणी सोडून आचमन करावे.नंतर दुपारी देवीला महानैवेद्य अर्पण करावा.नैवेद्य अर्पण करून झाल्यावर देवीपुढे विडा ठेवावा.सायंकाळी आरती करावी.*
*या ठिकाणी श्री घटस्थापनेचा विधी संपूर्ण झाला.*
*पहिल्या दिवशी प्रथम( *ओम गं गणपतये नमः* ) *या मंत्राचा १०८ वेळा म्हणजे एकमाळ जप करावा.*
*नंतर श्री देवीला सर्वात आवडता आणि प्रिय अशा नवार्ण मंत्राचा जप प्रारंभ करावा.*
*नवार्णमंत्र---*
*(*ओम ऐम् ह्रीम् क्लीम् चांमुडायै विच्चै नमः*)*
*हा जप आपल्या घरी किंवा मंदिरात सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी आपणास जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे करावा. नवरात्रात रोज हा जप करावा.*
*उदयोस्तु श्री जगदंबे!*










