Saturday, 25 April 2020

शकुनीची गोष्ट

*शकुनीची गोष्ट*


शकुनीचं वास्तव काय आहे?

गांधार देश व गांधारी याबद्दलची माहिती ही अत्यंत अल्प अशी माहिती आहे आपल्याला..महाभारत, कुरु व यदु कुल यांच्या प्रभावळीत गांधार देश हरवल्यासारखा आहे..

गांधार देश, गांधारी, शकुनी हा एक स्वतंत्र विषय होईल, एक मोठं पर्व, गांधार पर्व होईल एवढा इतिहास या गांधार देशाला महाभारतात आहे.परंतु, आपल्यापर्यंत केवळ गांधारी, तिचं अंध पतीला स्वीकारुन स्वतःचे नेत्र एका पट्टीनं बंद करणं व शकुनीचं कारस्थान एवढंच आलंय..

गांधार देश, आत्ताचा अफगाणिस्थान..राजा सुबल, यांना शकुनीसह एकूण शंभर पुत्र व गांधारीसह एकूण दहा कन्या होत्या..

गांधारी हे तिचं मूळ नाव नव्हे..गांधारीचं मूळ नाव शुभा हे होतं..जे गांधार देशावरुन नंतर गांधारी हे पडलं..शकुनीचं नाव सौबल..

शकुनि हा अत्यंत खलप्रवृत्तीचा असा..सर्वच बहिणींमध्ये शुभा ही अत्यंत लावण्यवती अशी..

तिला कायमच छळण्यात अग्रेसर असा शकुनी..

काल भीष्मांना कोणतं रहस्य समजलं होतं?

अल्पावधीत परतलेल्या गुप्तहेरांकडून कळलं, ते अचंबित करणारं होतं. 

गांधारीच्या जन्म पत्रिकेत पहिल्या पतीच्या मृत्यूचा योग होता. यावर उपाय म्हणून गांधारीचा विवाह एका बोकडाशी करायचा आणि नंतर त्या बोकडाचा बळी द्यायचा, असं राजज्योतिषानं सुचवलं. 

अतिशय गुप्त पद्धतीने हा विधी पार पडला. यथावकाश गांधारी धृतराष्ट्राशी विवाहबद्ध झाली. मात्र तिच्या पहिल्या विचित्र विवाहाची कल्पना कुरू कुलात कोणालाही देण्यात आली नाही..

हा वृत्तांत ऐकून पितामह संतापले. बोकडाशी लग्न लावून देऊन त्याचा बळी दिल्यानंतर आणलेली कुलवधू ही एक अर्थानं विधवा ( हे पितामहांचे त्यावेळचे विचार असावेत, आत्यंतिक संतापापोटी आलेले) अशी, हे उद्या जगाला समजलं तर सगळीकडं आपली छी थू होईल या संतापानं त्यांच्या मस्तकात विचारांच्या ठिणग्या पडू लागल्या..

त्यांनी विचार केला की मी समस्त सुबल कुटुंबाचा उच्छेद केला तर हे गुपित कोणाला कधीच समजणार नाही हा उद्देश..

त्यांनी गांधारीला बोलावून घेतलं आणि विचारलं. गांधारीने घाबरत संकोचत सारं काही मान्य केलं. क्षमायाचनाही केली. चेहरा शक्यतो निर्विकार ठेवत पितामहांनी तिला जायला सांगितलं..

फसवणुकीनं संतापलेल्या पितामहांनी गांधार देशी सैनिकांची तुकडी पाठवली. गांधारीचे वडील आणि सर्व भावांना कैद करून हस्तिनापुरात आणलं. झाल्या गोष्टीची शहानिशा केली आणि त्यांना तळघरात डांबलं. गांधारीनं खूप विनवण्या केल्या, पण पितामहांनी त्यांना मुक्त करण्यास ठाम नकार दिला.

बंदिखान्यात असणार्‍या सुबलाला. त्याच्या पुत्रांना भोजन म्हणून दररोज केवळ एक मूठ्भर भात दिला जात असे..या कृतीमागं असणारा भीष्मांचा उद्देश सुबलाच्या लक्षात आला..

तो आपल्या पुत्रांना म्हणाला, ‘एखाद्या कुटुंबाची हत्या करणं म्हणजे अधर्म हे धर्मज्ञ असणार्‍या भीष्माला माहिती आहे. तेव्हा धर्मानं घालून दिलेल्या आचारसंहितेचा भंग न करता आपल्या सर्वांना मारुन टाकण्याचा हा मार्ग भीष्मांनी शोधून काढलाय..भीष्म आपल्याला रोज  अन्न देतात हे खरं असलं तरीही आपल्याला दिलं जाणारं अन्न इतकं अल्प असतं की, आपली उपासमार होते..अन शेवटी आपण सर्व उपासमारीनंच मरणार आहोत हे नक्की.या परिस्थितीतून आपण काहीही मार्ग काढू शकत नाही.

आपण भीष्मांकडं जे अन्न देताय, त्यापेक्षा जास्त अन्‍न द्या हे सांगणां म्हणजे भीक मागण्यासारखं आहे..यापेक्षा अपमानाची गोष्ट दुसरी कोणतीही नसेल..
त्यापेक्षा उपासमारीनं मरण आलेलं पत्करलं..
तसंच पलायन करणं हेही अनुचित, क्षात्रधर्माला अनुसरुन नाही..'

काळ उलटत गेला..कारावासात असलेल्या सुबल व सुबलपुत्रांची शारीरिक अवस्था खालावत गेली..

अन त्यावरुन सुरु झाले भांडणतंटे..

जगभरात व इतिहासात जेवढी म्हणून युद्धं झाली आहेत ती,जमीन, धनसंपत्ती, स्त्री व उपासमार..अन्नासाठी.

तेच झालं मिळणार्‍या मूठभर अन्नासाठी सर्वांमध्ये भांडणं सुरु झाली..
क्षुधा व्याकुळ व क्षीण अशा सुबलानं या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या पुत्रांपुढं एक विचार मांडला..

सुबल म्हणाला, ‘ आपल्यापैकी जो कोणी सर्वाधिक बुद्धिमान असणार्‍यानं एकट्यानंच हा भात खाऊन दिवस कंठावेत..
मात्र, एका अटीवर..
त्यानं आपल्यावर झालेल्या या अन्यायाला कधीही विसरता कामा नये..इतकंच नव्हे तर, त्यानं भीष्मांचा सूड घेण्यासाठीच फक्त जीवित राहावं..
जीवनाचं अंतिम ध्येय केवळ हेच राहिल..'

सुबलाची ही योजना त्याच्या पुत्रांना मान्य झाली..सर्वांनीच टाचा घासून मरण्यापेक्षा एकानं कोणी जीवित राहून हा सूड घ्यावा ही योजना सर्वांनाच पटली.त्यानुसार सर्वात तरुण अशा सौबल उर्फ शकुनी या सुबलाच्या पुत्राची निवड झाली..दिलं जाणारं सर्व अन्न शकुनि एकटाच खाऊ लागला..अन कालांतरानं सुबल कुटुंबातील इतर सदस्य हे उपासमारीमुळं तडफडून मेले.. प्रत्येक भावाच्या निधनानंतर गांधारीनं विलाप केला, पितामहांची करूणा भाकली. पण ते द्रवले नाहीत. होता-होता गांधारीच्या पित्याचा अंत जवळ आला.

परंतु प्राण सोडण्यापूर्वी सुबलानं, शकुनीला बोलावून जवळ असणार्‍या लोखंडाच्या दंडाचा आघात त्याच्या पायावर केला..साहजिकच शकुनीच्या घोट्याचं हाड मोडलं..शकुनिच्या मोडलेल्या घोट्याकडं बघून सुबल त्याला म्हणाला,

'माझ्यानंतर तुला वाचवण्यासाठी गांधारी शर्थीचे प्रयत्न करेल. तू शक्यतो जिवंत राहशील. पण तुझं उरलेलं आयुष्य आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आहे, हे लक्षात असू देत.
तू आता आयुष्यभर लंगडत चालशील..अन प्रत्येक पाऊल टाकताना तू कुरुंनी आपल्या कुटुंबावर केलेल्या अन्यायाची आठवण ठेवशील..त्यांनी केलेल्या अपराधांची आठवण ठेवून त्यांना तू कधीही क्षमाही करु नकोस..

तुझा हा मोडलेला पाय, प्रत्येक पावलावर तुला या कर्तव्याची आठवण करून देत राहील...'

थोड्याच वेळात गांधार नरेशही मरण पावला. 

शकुनीला असणारी द्यूताची आत्यंतिक आवड ही सर्वांना माहिती होती..लहानपणापासून द्यूतक्रीडा व त्यातून लोकांना लुबाडणं हे सर्वश्रुत होतंच..

त्याच आवडीचा आधार घेत, सुबल त्याला म्हणाला, ‘माझ्या मृत्यूनंतर माझ्या बोटांच्या हाडांपासून तू द्यूतात वापरले जाणारे फासे घडव..या बोटांच्या हाडांमध्ये कुरुकुलाबद्दल मला असलेला सारा संताप व क्लेश उतरले आहेत.अन एवढंच नव्हे तर, हे फासे तुझ्या हुकुमाचे ताबेदार असतील..तुला हवं असणारं दान प्रत्येक वेळी पडत जाईल..
परिणामी, या फाशांच्या साहाय्यानं तू द्यूताचा प्रत्येक डाव जिंकत जाशील..'

भावांच्या मृत्यूंनंतर पित्याच्याही मृत्युनं गांधारी कोसळली. शकुनीला अभय द्या किंवा मलाही त्याच पद्धतीनं मरू द्या, असं म्हणत पितामहांच्या पावलांवर कोसळली. 

पितामहांना तोवर आपल्या वागण्याच्या योग्यायोग्यतेबाबत संदेह वाटू लागला होता. त्यांनी शकुनीला अभय दिलं... शकुनी हस्तिनापुरातच वाढू लागला...
भीष्मांनी इतर मुलांबरोबरच त्याचं पालनपोषणही केलं..

शकुनि आपणा कुरुकुलाचं हित चिंतणारे आहोत हे दर्शवत राहिला...
पणा भीष्माच्या आधिपत्याखाली वाढणार्‍या या कुळाचा सत्यानाश कसा घडवता येईल हा विचार सतत त्याच्या मनात राहिला..अन त्या दिशेनं त्याची पावलं चालत राहिली.. आणि पुढं सर्वज्ञात महाभारत घडलं...

गांधारीच्या मनातही कमी गाठी नव्हत्या..तिच्या संपूर्ण कुटुंबाची भीष्मांनी केलेली वाताहत कायमच धगधगत राहिली.

कुंती नंतर माद्री यांचे विवाह झाले..

तिन्ही विवाहांच्या तर्‍हा वेगळ्या..तिचा विवाह ज्या तर्‍हेनं झाला त्याबद्दल तिच्या मनी एक खंतही होती..आपणा या कुलात सम्राज्ञी म्हणून आलो असलो तरीही आपला विवाह साधेपणानं झाला व खटकणारी गोष्ट म्हणजे विवाहाचा सर्व खर्च तिच्या पित्याला करावा लागला होता..म्हणजे सुबल कुल योग्यतेचं नव्हतं का?
मानभंगाचं शल्य कायमच तिच्या मनात राहिलं..

शकुनीनं कौरव-पांडवांमध्ये कलह माजवला, जो की दोन्ही परिवारांना फक्त विनाशाकडे घेऊन गेला..

#शकुनी_काय_आहे?

शकुनी ही मूर्तिमंत खलप्रवृत्ती आहे...नकारात्मकता आहे..
चांगलं न बघवण्याची ही वृत्ती..

गांधारीच्याच एका आत्मकथनात, गांधारी लहान असतानाच शकुनीनं तिला कमळांच्या पुष्करिणीत ढकलून दिलं अन तिला वाचवायला जाणार्‍य बहिणींना त्यानं घाबरवलं, तुम्ही गेलात तर शुभा तुम्हालाही आत ओढेल..

घाबरवणं, भीती घालून न घडणार्‍या गोष्टीही मनात ठसवू पाहणार्‍या या वृत्तीचा जनक शकुनी असावा..

#धृतराष्ट्र...सतत आपल्या अंधपणाचा गंड बाळगून त्याबद्दल सहानुभूती मिळवण्यासाठी आक्रंदणारा..

सतत परिस्थितीला दोष देत रडत राहण्याची वृत्ती म्हणाजे धृतराष्ट्र..

महाभारतातली ही पात्रं, एकेक वृत्तीची उदाहरणं आहेत.

कुरुकुलाला संपवण्यासाठी कारणीभूत असणार्‍यात, भीष्म सर्वात आधी..

समस्त कुरुकुलाच्या अधोगतीला कारणीभूत ठरलं ते कुरुकुलच..

त्यातली प्रत्येक व्यक्ती..

शांतनुपासून ते शकुनीपर्यंत,अश्वत्थाम्यापर्यंत.
भीष्मही यातून सुटलेले नाहीत..

न विचार करता केलेली प्रतिज्ञा, त्याचा परिणाम किती भयंकर होऊ शकतो हा विचार न करता ती केली..

माणसाला असणारा मोह, किंवा माणसाचा ह्व्यास हा व हाच त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरतो, हा महाभारताचा सारांश आहे..

कुरुकुल म्हणाजे मानवी जीवन..अन ही सर्व त्यातल्या चांगल्या वाईट वृत्ती..

बारकाईनं विचार केला तर महाभारतात सारे प्रसंग, साऱ्या घटना, साऱ्या कथा या जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या , सर्व भावभावनांना स्थान देणाऱ्या आहेत. 

महाभारतातही शृंगारापासून शांतरसापर्यंत साऱ्या रसांचा आविष्कार सहजपणे घडताना दिसतो. 


#तळटीप:-

कालपासून द्यूतक्रीडेचे भाग दूरदर्शनवर दाखवत आहेत..

त्यात एक प्रसंग असा आहे, शकुनी ही माझी सेना आहे, दुर्योधन.
पण ती तुझ्याकडे असू देत.
द्यूतक्रीडेच्या वेळी मला दे'

जेव्हा शकुनी माझ्या वतीनं फासे टाकेल हे दुर्योधंन म्हणतो तेव्हा विदुर काय म्हणतात बघितलंय का?

विदुर म्हणतात, द्यूत दुर्योधनाकडच्या फाशांनी होईल..

अन इथं शकुनीचा डाव बरोबर लागू पडतो.
विदुरांना जो संशय असतो,शकुनीच्या चलाखीचा तो बरोबर असतो...

पण शकुनी चलाखी करतोच..
त्याचे फासे दुर्योधनाकडे दिलेले असतात,जे विदुरांना माहिती नसतं.
तेच,सुबलाच्या अस्थीपासून केलेले.

No comments:

Post a Comment